देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशातली जनता कोरोना महामारीबरोबरच वाढत्या महागाईनेही त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशात खाद्य तेलाच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दशकाचा विचार करता, या महिन्यात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींसंदर्भात, संबंधित सर्व पक्षांशी सोमवारी चर्चा केली. या बैठकीत विभागाने राज्यांबरोबरच व्यापाऱ्यांनाही खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास सांगितले आहे. बैठकीनंतर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात खाद्य तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यावर खुद्द केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. यानंतर खाद्य तेलाच्या व्यापाराशी संबंधित सर्व पक्षांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.”

भारतात खाद्य तेलाची ६० टक्के आयात परदेशातून होते. यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय किंमतींसोबत जोडून पाहिला जातो. स्टेट सिव्हिल सप्लाईज डिपार्टमेन्टच्या आकडेवारीनुसार, देशातील रिटेलमध्ये खाद्य तेलाचे मासीक सरासरी दर जानेवारी २०१० पासून आतापर्यंत सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहेत. हे आकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत १६४.४४ रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचली. गेल्या मे महिन्याचा विचार करता, ही किंमत ३९ टक्के अधिक आहे. मे २०२० मध्ये मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत ११८.२५ रुपये प्रति किलो ग्रॅम एवढी होती. भारतातील बहुतांश घरांत भोजन बनविण्यासाठी याच तेलाचा वापर केला जातो. मे २०१० मध्ये या तेलाची किंमत ६०.०५ रुपये प्रति किलो ग्रॅम होती.

गेल्या वर्षींच्या तुलनेत या तेलांच्या सरासरी किंमतीत १९ ते ५२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मे महिन्यात या तेलाची सरासरी किंमत १३१.६९ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४९ टक्के अधिक होते. भारतातील अनेक घरांत पाम ऑईलचाही वापर केला जातो. मे २०२० मध्ये पाम ऑईलचा सरासरी दर ८८.२७ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. तर एप्रिल २०१० मध्ये याचा दर ४९.१३ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. इतर तेलांच्या सरासरी दराचा विचार करता, शेंगदाना तेल १७५.५५ रुपये, वनस्पती तेल १२८.७ रुपये, सोयाबीन तेल १४८.२७ रुपये आणि सनफ्लावर तेल १६९.५४ रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचले आहे.