प्रश्नोत्तराचे चित्रीकरण करणाऱ्या  विद्यार्थ्याच्या अटकेचे शिक्षणमंत्र्यांनी दिले आदेश

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. एका विद्यार्थ्याने मोफत शिक्षणाविषयी प्रश्न विचारला तेव्हा तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे आडमुठे उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय त्याचे चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जायला निघाले. मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळ  केल्यानंतर तावडे यांनी प्रश्न विचारण्यास परवानगी दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?’ हा प्रश्न प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो आवडला नाही.‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे उर्मट उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करा –

पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रकराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही गोष्ट ध्यानात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करून झालेले चित्रण डिलीट करण्यास सांगितले. परंतु युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले. या प्रकारामुळे शिक्षणमंत्री संतापले त्यांनी या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांना दिले.

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार, पोलिसांनी  युवराजचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. काही शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी तावडे यांना युवराजला सोडण्याची विनंती केली. विद्यार्थी पोलिसांच्या वाहनामागे धावत गेले. शिक्षणमंत्री  गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवून दिले; मात्र त्याचा मोबाईल परत केला नाही.