परीक्षेचे गुण चुकीचे आले अन् मंत्री उदय सामंत विद्यार्थ्याच्या मदतीला धावले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मुंबई विद्यापीठाच्या तांत्रिक चुकीमुळे एका विद्यार्थ्याला चुकीचे दिले गेल्याने त्याच्या निकालावर परिणाम झाला. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे त्या विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धाऊन गेले. रत्नागिरी येथील प्रतीक कदम विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उदय सामंत यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीमुळे प्रतिकचा गुणाचा प्रश्न सुटला.

रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलेजमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या प्रतीक कदम या विद्यार्थ्याबाबत ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याचे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मुंबई विद्यापीठाकडे तंत्रिकतृष्ट्या चुकीचे गेले. त्यामुळे प्रतिक अनुत्तीर्ण असल्याचा निकाल देण्यात आला. यामुळे प्रतिकचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार होते. विनाकारण त्याच्या गुणपत्रिकेवर नापास असा शिक्का बसणार होता. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत होते.

विद्यापीठाकडून संबंधित विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणपत्रकेमध्ये 43 ऐवजी 4 गुण नोंदवले गेले. ही तंत्रिक बाब संबंधित महाविद्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या प्रकरणी तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक होते. ही बाब उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी तातडीने विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्याला योग्य त्या गुणपत्रिका तात्काळ देण्याचे निर्देश दिले.