Lockdown : ‘लॉकडाऊन’ काळात कोणत्याही प्रकारची ‘फी’ मागू नये, शिक्षणमंत्र्यांची शाळांना ‘तंबी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान शाळांनी विद्यार्थी-पालकांकडून कोणत्याही प्रकारची फीची मागणी करू नये अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने 30 मार्च रोजी काढले आहे. मात्र, तरीही काही शाळा फीवसुलीसाठी पालकांच्या मागे तगादा लावत असल्याने आज शिक्षणमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमाने शाळांना ही तंबी द्यावी लागली.

तर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी
वर्षा गायकवाड म्हणाल्या, करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आहे हे सर्वांना माहित आहे. ही संचारबंदी 3 मेपर्यंत असणार आहे. मला सोशल मीडियाच्या आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेकडून या लॉकडाऊनच्या काळातही फीची मागणी होत आहे. मी सांगू इच्छिते की आजची सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहता आणि पालकांची पैशांची उपलब्धता पाहता, माझे सर्व शाळा आणि संस्थांना आवाहन आहे की तुम्ही फीची मागणी करू नका.

परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे की, लॉकडाऊनच्या काळात तुम्ही विद्यार्थी-पालकांकडून फीची कोणत्याही प्रकारची मागणी करू नये. माझं पालकांना आवाहन आहे की, अशी मागणी होत असल्यास तुम्ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या परिपत्राकाची अंमलबजावणी करावी, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.