शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ‘त्या’ शाळांची चौकशी करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात शाळा बंद असताना काही शाळांनी अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावला होता. अशा शाळांवर कारवाईची शक्यता आता निर्माण झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढणे, गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे असे प्रकार घडले होते. ज्या शाळांबाबत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन, योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात आणि ऑनलाईन शिक्षणासंदर्भात अनेक तक्रारी शिक्षक संघटना व पालक संघटनांनी शिक्षण मंत्री गायकवाड यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सोमवारी (दि. 22) शुल्क वाढीबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी वर्षा गायकवाड बोलत होत्या. शिक्षणाचा हक्क अधिनियम अंतर्गत शाळेतील कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची शालेय शिक्षण विभाग योग्य ती खबरदारी घेईल, अशी ग्वाही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने एक विशेष समिती स्थापन केली आहे. तसेच अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर RTE नुसार कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.