Coronavirus Lockdown : शाळा सुरू होईपर्यंत फीस घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लढा देत आहे. काही स्वयंसेवी संस्था देखील देशातील असहाय्य् जनतेच्या मदतीसाठी पुढे आल्या असताना दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना दिले.

वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये
यावेळी बोलताना त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांना पुढील वर्षाचे वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क न घेण्याचे निर्देश दिले. दरम्यान, हरियाणा सरकारने देखील जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे.

शाळांमध्ये शिल्लक असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करा
दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच शालेय पोषण आहार योजनेतंर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबतही आदेश दिले आहेत.