शिक्षक भरतीचे व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक : विनोद तावडे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून ‘पवित्र पोर्टल’ सुरु करण्यात आले. याच पोर्टलमार्फत खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यापैकी एकाची निवड संस्थाचालकांना करता येणार आहे. मात्र या मुलाखतींचे व्हिडीओ चित्रीकरण करणे त्या संस्थांवर बंधनकारक असणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ विनोद तावडे यांच्या हस्ते गुरूवारी झाला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शिक्षक व प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले. प्राध्यापक भरती तातडीने व्हावी यासाठी विद्यापीठस्तरावरून पाठवली जाणारे ३०० पॅनल तयार ठेवण्याच्या सुचना विद्यापीठांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षक भरती होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून लाखो रूपयांचे डोनेशन घेतले जात आहे. याला अटकाव करण्यासाठी अभियोग्यता परीक्षा घेऊन त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी पवित्र हे पोर्टल सुरू करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच अनुदानित खाजगी शाळा शिक्षकांच्या २० हजार शिक्षकांच्या जागा याव्दारे भरल्या जाणार आहेत.

भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणीत उत्तीर्ण झालेल्या १ लाख २१ हजार ६१५ उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. उर्वरित परीक्षा दिलेल्या ४९ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर माहिती भरलेली नाही. यातील १३ हजार ९३ विद्यार्थ्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने १ लाख ८ हजार ४६४ उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत.