NEET PG 2021 Date: NBE ने जाहीर केल्या नीट पीजी, एमडीएस आणि इतर परीक्षांच्या तारखा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) पीजी आणि एमडीएससाठी आगामी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी) यासह इतर परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे. यासंदर्भात एनबीईच्या अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एनईईटी पीजी परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी, नीट एमडीएस १६ डिसेंबर २०२० रोजी, विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) ४ डिसेंबर २०२० रोजी आणि डीएनबी पोस्ट डिप्लोमा सेंट्रलाइज्ड प्रवेश परीक्षा (डीएनबी पीडीसीईटी) २८ जानेवारी २०२१ रोजी होण्याची शक्यता आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सूचना बुलेटिन आणि अर्ज पत्र एनबीईच्या संकेतस्थळ nbe.edu.in वर जाहीर केले जातील.

नीट पीजी २०२१ साठी अशा प्रकारे करू शकता अर्ज
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in. वर लॉगिन करावे. होम पेजवर ऍप्लिकेशन प्रोसेस लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवारांनी मागितलेली सर्व माहिती प्रविष्ट करुन शिक्षण, जन्मतारीख प्रमाणपत्र अपलोड करावे. यानंतर अर्ज फी भरून सबमिट करा. भविष्यातील वापरासाठी भरलेला अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून तो सुरक्षितपणे ठेवा.

नीट पीजीसाठी पात्रता निकष
अर्जदाराकडे मान्यताप्राप्त महाविद्यालय/ विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असावी. याव्यतिरिक्त उमेदवाराकडे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलकडून जारी एमबीबीएस पात्रतेचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मागील वर्षी देशभरातील महाविद्यालयांमधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत (एनईईटी पीजी) सुमारे १.५० लाख उमेदवारांनी भाग घेतला होता. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) १६५ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली होती.