शिक्षणाची गंगा कष्टकऱ्यांच्या झोपडीपर्यंत ! अपंग शिक्षकाची तळमळ

लासलगाव – पोलीसनामा ऑनलाइन  – छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अविरतपणे गोरगरिबांसह सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत.आज कोरोना संसर्ग वाढीच्या काळात शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन सुरू आहे.परंतु अनेक कष्टकरी,श्रमिक,अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तींकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही तर नाही पण साधा मोबाईल ही नाही,अशा पालकांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण कसं मिळणार.

परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव ता.निफाड येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक प्रशांत तुपे हे स्वतः श्रवणदोषाने बालपणापासूनच अपंग आहेत.त्यांनी स्वतः अशा पालकांच्या घरी जात असून शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोच करीत आहेत.खरोखरच त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात प्रकाश कसा निर्माण होईल,असा ध्यास तुपे यांनी नोकरीच्या सुरूवातीच्या काळातच घेतलेला आहे.

गेली २३ वर्ष त्यांनी अत्यंत गरीब विद्यार्थिनींना दरवर्षी दत्तक घेऊन दिवाळीला नवीन कपडे,गरजेच्या वस्तू दिल्या आहेत,तसेच अशा विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सर्व प्रकारचे लेखन साहित्य पुरवित असतात.त्यांनी हुशार विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी इयत्ता चौथी व पाचवीचे शिष्यवृत्तीचे अनेक वर्षे रविवारी सुट्टीच्या दिवशी जादा तास मोफत घेतलेले आहेत.आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व नवोदय साठी निवड झालेले आहेत.

अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.कारगिल निधी,सैनिक निधी,भूकंपग्रस्त निधी,पूरग्रस्त निधी अनेकदा स्वतःच्या निधीसह संकलित केलेले आहेत.रक्तदान ही अनेकदा केलेले आहेत.नोकरीच्या सुरूवातीला १५ वर्ष तर त्यांचे समाजप्रबोधन पर अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत.तुपे यांना त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना राज्य पुरस्काराने गौरविले आहे.