मराठा आरक्षणाच्या 12 % जागांचा कोटा वाढवून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करायला हवी : चंद्रकांत पाटील

पुणे – मराठा आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या 12 टक्के जागा राखीव ठेवून शासनाने प्रवेश प्रक्रिया सुरू करायला हवी. परंतु सरकार कुठलीच चर्चा करण्यास तयार नाही, असे मत भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील नागरी सुविधांच्या अडचणी संदर्भात आज महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. भाजपचे सरकार असते तर यातून तुम्ही कसा मार्ग काढला असता ? यावर बोलताना पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

पाटील म्हणाले, की सरकार मुळात कुठल्याच मुद्द्यावर सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत आम्ही यापूर्वीही शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करा, अशी सूचना केली आहे . प्रवेश प्रकिया सुरू करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या 12 टक्के जागांचा कोटा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करता येऊ शकते, असे आमचे मत आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रभागी असलेले खासदार उदयन राजे, संभाजी राजे यांच्याकडून अशी भूमिका मांडली गेली नाही. यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, मी प्रदेश अध्यक्ष असल्याने आता मी बोललो म्हणजे भाजपचे सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी बोलले.