Coronavirus Impact : पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था ‘कोरोना’मुळे ‘हतबल’, संस्था प्रमुखांनी मांडली ‘कैफीयत’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तसेच शाळा, महाविद्यालय देखील बंद आहेत. राज्यात मुंबई, पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अद्यापही शाळा, महाविद्यलय बंद आहेत. कोरोनामुळे यंदा अनेक शैक्षणिक संस्था अडचणीत आलेल्या असतानाच आता पुण्यातील 100 वर्षापेक्षा जास्त काळ ज्ञानदान करणाऱ्या संस्थांनीही आपली कैफियत मांडली आहे.

यंदा शैक्षणिक शुल्कात वाढ करता येणार नाही, त्याचसह कोट्यावधी रुपये अनुदान थकलेले आहे, पाय़ाभूत सुविधांसह आता स्वच्छतेचा खर्च कोट्यावधी रुपयामध्ये जाणार आहे. त्यामुळे प्रचंड आर्थीक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. यातून सुटका करण्यासाठी राज्य सरकारने अनुदान लवकरात लवकर द्यावेच पण त्यासह शिक्षण संस्थांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्याचे व्याज सरकारने भरावे अशी मागणी करण्यात आली आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय कधी सुरु होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे. यातही अनेक अडचणी असून, घरात एकच मोबाइल असणे, इंटरनेटची उपलब्धता यामुळे सर्वांनाच हे शिक्षण सहज मिळू शकणार नाही. पहिले सत्र वाया जाणार असल्याने व त्यानंतरही निम्मे दिवस विद्यार्थ्यांमध्ये शाळा, महाविद्यालये सुरु करावी लागणार आहेत. या काळात आमच्या समोर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे, असे डॉ. शरद कुंटे यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात नव्याने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करता आलेली नाही. कोरोनामुळे स्वच्छतेवरचा रोजचा खर्च लाखो रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यातच शुल्कवाढ न करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे वेतन, पायाभूत सुविधांवरचा खर्च जमा होणाऱ्या शुल्कातूनच करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी मोठी आर्थिक कोंडी होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने थकलेले कोट्यावधी रुपयांचे अनुदान संस्थान द्यावे, शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी त्यामुळे संस्थांना मदत होईल. असे अ‍ॅड. एस.के. जैन यांनी सांगितले.

नवीन वर्ष सुरु होत असले तरी चारीही संस्थांच्या एकाही शाळेने पालकांना शुल्क भरा अशी सूचना केलेली नाही. कोणाचाही प्रवेश रोखलेला नाही. सध्या सर्वांचीच स्थिती गंभीर असल्याने आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे कर्वे संस्था नियामक मंडळाचे राजन गोऱ्हे यांनी सांगितले.