लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक; शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. शिर्के

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि एस. डी. महाविद्यालय, अलापुझ्झा (केरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने नव्वदोत्तरी कालखंडातील लिंग अभ्यास तंत्रज्ञानात्मक बाबी व सक्षमीकरणाचे वास्तव या विषयावर शुक्रवारी आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के याच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, लिंग समानता प्रस्थापनेच्या दृष्टीने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते यांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ शिर्के यांनी केले आहे.

दरम्यान, आपण लिंगसमानता विषयक बाबींचा प्रसार, प्रचार प्रभावीपणे करू शकतो. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांसह तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देणारे पालक, शिक्षक यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे, असेही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी त्यावेळी सांगितले. तर तंत्रज्ञानामुळे महिला सबलीकरणाच्या चळवळीला नवे आयाम प्राप्त झाले असल्याचे एस. डी. महाविद्यालयाचे व्यवस्थापक पी. कृष्ण कुमार यांनी सांगितले.