इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं 91 वर्षी निधन, 30 वर्षापर्यंत होती सत्ता

कैरो : वृत्तसंस्था – इजिप्तवर जवळपास तीस वर्षे सत्ता गाजवणारे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचे मंगळवारी (दि. 25) निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. इजिप्तमध्ये 2011 मध्ये झालेल्या आंदोलनानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. होस्नी मुबारक यांच्या 30 वर्षाच्या सत्ताकाळात अमेरिका व इजिप्त यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच इस्त्राएलसोबतही चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. दहशतवदाविरोधात ठाम भूमिका घेतली होती.

इजिप्तमधील युवकांनी होस्नी मुबारक यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभारला. राजधानी कैरोतील तहरीर चौकामध्ये लाखो नागरिकांनी निदर्शने केली. सलग 18 दिवस तहरीर चौकात आंदोलन सुरु होते. या आंदोलनाची धक इतर शहरातही पोहचली. अखेर तहरीर चौकातील लाखो आंदोलकांनी मुबारक पॅलेसकडे कूच करण्यास सुरुवात केली. होस्नी यांच्याविरोधात इजिप्तचे लष्कर देखील उभे राहिले. अखेर होस्नी यांना 11 फेब्रुवारी 2011 रोजी सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या आंदोलनादरम्यान इजिप्तमध्ये हिंसाचार देखील झाला होता.

आजन्म जन्मठेपेची शिक्षा
होस्नी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर इजिप्तच्या लष्कर प्रमुखांनी सत्ता काबीज केली. होस्नी मुबारक आणि त्यांचे माजी सुरक्षा प्रमुख यांच्याविरोधात खटला चालवण्यात आला. या खटल्यात 900 आंदोलकांच्या हत्येप्रकरणात दोघांना कोर्टाने दोषी ठरवत आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. मार्च 2017 मध्ये त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात कैरोत हजारो नागरिकांनी निदर्शने केली होती