‘ओसामा’च्या जवळच्या दहशतवाद्याची सूटका, लठ्ठपणामुळे ‘कोरोना’चा होता धोका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा डावा हात मानला जाणारा आदिल अब्दुल बारी याची अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. युरोपमध्ये लादेनचा प्रवक्ता मानला जाणारा हा दहशतवादी न्यू जर्सी तुरुंगात बंद होता आणि आता तो युनायटेड किंगडमला पोहोचला आहे. आदिलवर पूर्व आफ्रिकेतील अमेरिकेच्या दूतावासावर बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे, जो अमेरिकन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापूर्वी हा अमेरिकेवर अल कायदाचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जाते. न्यूयॉर्कमधील एक वरिष्ठ न्यायाधीशांनी सांगितले की, वाढत्या वजनामुळे आदिलला कोरोना होण्याचा मोठा धोका होता. म्हणून त्याला सोडण्यात आले व परत ब्रिटनला पाठविण्यात आले.

इजिप्तमध्ये जन्मलेल्या आदिलने 1991 मध्ये ब्रिटनमध्ये राजकीय निर्वासित होण्यासाठी अर्ज केला आणि त्याच्या संपर्कांद्वारे आदिलचा अर्ज 1993 मध्येही मान्य करण्यात आला. 1998 मध्ये अल-कायदाच्या शक्तिशाली बॉम्बने भरलेले दोन ट्रक लटांझानिया आणि केनियामध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासात जाऊन धडकले, ज्यात 224 जण ठार झाले. युरोपमधील अल कायदाचा प्रवक्ता म्हणून आदिलने पत्रकारांना सांगितले की, अल-कायदाने पूर्व आफ्रिकेत अमेरिकन दूतावासावर दहशतवादी हल्ला केला आहे. आदिलला 6 मुले आहेत, त्यातील एक मुलगा आयएसआयएसचा अतिरेकी आहे.

1999 मध्ये स्कॉटलंड यार्डमधील गुप्तहेरांनी राजदूतांवर हल्ल्याच्या आरोपावरून आदिलला अटक केली. आदिलने कबूल केले होते की, त्याने हा हल्ला करण्याची योजना आखली होती, त्यानंतर त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 2012 मध्ये त्याला अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. त्याने 25 वर्षांपैकी 21 वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे.

आदिलचे वकील म्हणतात की, आता त्याला आपल्या कुटुंबासमवेत ब्रिटनमध्ये शांत जीवन जगण्याची इच्छा आहे. असा विश्वास आहे की, हा दहशतवादी पुन्हा ब्रिटनमध्ये आला तर त्याविरोधात निदर्शने होऊ शकतात. यासंदर्भात एका सुरक्षा स्त्रोताचे म्हणणे आहे की, युनायटेड किंगडममध्ये या दहशतवाद्याचे आगमन गृहसचिवांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्याचबरोबर ब्रिटनची गुप्तचर संस्था आणि पोलिसही या दहशतवाद्यावर कायम नजर ठेवू शकतात.