उद्या सकाळपासून विकेंडपर्यंत पृथ्वीच्या दिशेने येतायेत 8 ‘अ‍ॅस्टेरॉयड्स’, NASA नं केलं अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उद्या सकाळ ५ जूनपासून ते या आठवड्यापर्यंत पृथ्वीच्या जवळून काही लघुग्रह बाहेर पडणार आहेत. त्यातील काही लहान आहेत. परंतु काही स्टेडियमच्या आकाराचे देखील आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे की, यातील ८ नियर अर्थ ऑब्जेक्ट्स (एनईओ) पृथ्वीच्या जवळून ५ जूनच्या सकाळपासून पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत काही लघुग्रह बाहेर पडणार आहेत.

नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट्स स्टडीजने सांगितले आहे की, ५ जून रोजी सकाळी ४.४४ वाजता लघुग्रह २०२०केएन५ पृथ्वीच्या जवळून जाईल. त्याचा व्यास सुमारे २४ ते ५४ मीटर दरम्यान आहे. हे १२.६६ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने म्हणजे ४५,५७६ किलोमीटर प्रति तास वेगाने जाईल. हे पृथ्वीच्या जवळून सुमारे ६१ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल.

५ जून रोजी संध्याकाळी ५.४१ वाजता लघुग्रह २०२०केए६ पृथ्वीवरून ४४.१३ लाख किलोमीटर अंतरावरुन जाईल. त्याचा व्यास सुमारे २८ मीटर आहे. हे पृथ्वीच्या जवळून सुमारे ४१,६५२ किलोमीटर प्रति तास वेगाने जाईल.

यानंतर ६ जून रोजी भारतीय वेळेनुसार, सकाळी ८.५० च्या सुमारास लघुग्रह २००२एनएन४ पृथ्वीजवळून जाईल. पृथ्वीपासून त्याचे अंतर सुमारे ५१ लाख किलोमीटर असेल. हे पृथ्वीजवळून ताशी ४०,१४० किमी वेगाने जाईल. या लघुग्रहाचा व्यास ५७० मीटर आहे. म्हणजे पाच फुटबॉल मैदानाच्या बरोबर.

६ जून रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास २०२०केओ१ नावाचा एक लघुग्रह देखील पृथ्वीजवळून जाणार आहे. तो पृथ्वीपासून ५०.९३ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. त्याचा वेग ताशी २१,९३० किमी असेल. त्याचा आकार फार मोठा नाही. त्याचा व्यास २६ मीटर ते ५९ मीटर पर्यंत असू शकतो.

६ जून रोजी रात्री ११.०८ वाजता लघुग्रह २०२०केक्यू१ जाईल. त्याचा व्यास ३६ ते ८१ मीटर दरम्यान असेल. हा पृथ्वीपासून ५१.२३ लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. याचा वेग ताशी ५३,७४८ किलोमीटर असेल.

लघुग्रह २०२०एलए ६ जून रोजी दुपारी १:३० वाजता पृथ्वीपासून सुमारे १४.३१ लाख किलोमीटर अंतरावरुन जाईल. त्याचा व्यास २४ ते ५३ मीटर दरम्यान आहे. त्याचा वेग ताशी ५५,५८४ किलोमीटर आहे.

यानंतर ७ जून रोजी दुपारी १२.०३ वाजता लघुग्रह २०२०केए७ पृथ्वीच्या बाजूने जाईल. हा पृथ्वीपासून सुमारे १४.६७ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. त्याचा व्यास २३ ते ५१ मीटर दरम्यान असेल. त्याचा वेग ताशी २६,४२४ किलोमीटर आहे.

७ जून रोजी दुपारी १२.४५ वाजता लघुग्रह २०२०केके३ पृथ्वी जवळून जाईल. हा पृथ्वीपासून ६८.०२ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. त्याचा व्यास २२ मीटर ते ४९ मीटर दरम्यान असू शकतो. त्याचा वेग ताशी ४२,८७६ किलोमीटर आहे.