मेक्सिकोच्या सॅन्टोस लागूना क्लबच्या 8 फुटबॉलपटूंना ‘कोरोना’ची लागण

मेक्सिको : मेक्सिकोच्या सॅन्टोस लागूना क्लबमधील ८ फुटबॉल खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे़ मात्र, त्यांच्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याचे मेक्सिकन प्रशासकीय समितीने सांगितले आहे. मेक्सिकोमधील सर्वात लोकप्रिय मेक्सिकन लीग २५ मार्च रोजी स्थगित करण्यात आली आहे. ही फुटबॉल स्पर्धा कधी सुरु होईल, याची माहिती अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

सॅटोस लागुना क्लबने सोमवारी त्यांच्या सर्व खेळाडुंची कोरोना चाचणी घेतली. त्यानंतर क्लबमधील ८ खेळाडुंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, क्लबने या खेळाडुंची नावे जाहीर केली नाहीत.

लीगा एमएक्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या खेळाडुंचे निरीक्षण केले जाईल आणि लीगा एमएक्सच्या सर्व खेळाडुंच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. मेक्सिकोमध्ये ५६ हजार ५६९ जणांना आतापर्यंत कोरानाची लागण झाली असून त्यापैकी ६ हजार २० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.