खळबळजनक ! गर्भवती ‘ड्रग्ज क्विन’ची चौथ्या पतीकडून हत्या, गर्भात होती जुळी मुलं; गोळी झाडतानाची दृष्य CCTV मध्ये कैद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेची तिच्या चौथ्या पतीने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात घडली असून मयत महिलेच्या गर्भामध्ये जुळी मुलं होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सायना (वय-29) असे खून झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. सायना ही ड्रग्जची (ड्रग्ज डिलर) विक्री करायची. त्यामुळे तिला ड्रग्ज क्विन म्हणून ओळखले जात होते. यामध्ये तिचा चौथा पती वसीम जखमी झाला असून गोळ्या झाडतानाची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळावर पोहचेपर्यंत सायनाचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिचा नोकर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आला. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये पती वसीम याने सायनावर अनेक गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या मदतीसाठी आलेल्यांवर देखील वसीमने गोळ्या झाडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

सायना जामीनावर बाहेर

मयत सायना हिने चौथा पती वसीमसोबत विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर तिला ड्रग्ज विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तिला आठ महिन्यांची गर्भवती असल्याने आणि गर्भात जुळी मुलं असल्याने जामीन मिळाला होता. तिच्या पहिल्या दोन्ही पतींनी तिला सोडून बांगलादेशला निघून गेले. त्यानंतर तिने दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रग्ज लार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शराफत शेख सोबत लग्न केले. त्याला एनडीपी कायद्याखाली अटक करण्यात आल्यानंतर सायनाने वसीमसोबत लग्न केले.

वसीमचे सायनाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध

पोलिसांनी सायनाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तिचा पती वसीम याने तिची बहिण रिहानासोबत विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, सायना जामीनावर सुटल्याने वसीम आणि रिहाना यांच्या प्रेमसंबंधामध्ये ती अडसर होऊ लागली. यावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले. रिहाना सोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सायनाला संपवण्याचा निर्णय वसीमने घेतला.

स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन
मंगळवारी सकाळी सायनाला संपवण्याच्या उद्देशाने तो पिस्तूल घेऊन आला. सायनाच्या घरी आल्यानंतर त्याने तिच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी नोकराने मध्यस्थी केली. मात्र संतापलेल्या वसीमने त्याच्यावर देखील गोळ्या झाडल्या. यामध्ये सायनाचा जागीच मृत्यू झाला. तर नोकर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वसीम स्वत: निजामुद्दीन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणात रिहानाचा संबंध आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.