पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढतोय, आणखी ‘इतके’ कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पिंपरी पोलिसांना देखील कोरोनाची लागण होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आणखी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (शनिवार) समोर आलं आहे. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 40 वर गेली आहे. यातील 16 पोलीस करोनामुक्त झाले असून ते ड्युटीवर हजर झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. शहरामध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सोमवारी दोन वरिष्ठ निरीक्षकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातली कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता बुधवारी सात कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच शुक्रवारी तीन पोलिसांचा तर शनिवारी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन उपनिरिक्षकांचा समावेश आहे. अहवाल आल्यानंतर त्यांच्या कुटंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. कोरोना विषाणूने पोलिसांना आपल्या विळख्यात घेतल्याने चिंता वाढली आहे. आयुक्तालयातील एकूण कोरोनाबाधित चाळीस अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी 16 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 24 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like