एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा Facebook, याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला कोर्टानं सुनावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली आहे. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Trucaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत. सुरक्षेचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जवान हे अ‍ॅप डिलीट करत आहेत. मात्र, एका लेफ्टनंट कर्नलने या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी फेसबुक वापरण्याची परवानगी मागितली आहे. यावर न्यायालयाने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

भारतीय सैन्यदलाने चीनविरोधात मदत करणाऱ्या अमेरिकेच्या अ‍ॅपविरोधात मोहिम उघडली आहे. यामध्ये अमेरिकेचे फेसबुक इन्स्टाग्रामसारखी अ‍ॅप आहेत. अशा 89 अ‍ॅपवर भारतीय सैन्यदलाने माहिती चोरत असल्याचा आक्षेप घेतला असून ही अ‍ॅप जवानांनी आपल्या मोबाईलमधून तात्काळ काढून टाकावीत असे आदेश दिले आहेत. यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अ‍ॅप आहेत. तर पब्जीसारखे गेमिंग अ‍ॅपही आहेत. तसेच डेली हंट हे न्यूज अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगितले असल्याचे लष्कराच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

याविरोधात लेफ्टनंट कर्नल के.पी. चौधरी यांनी फेसबुकसह या अ‍ॅपचाही वापर न करण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दाखल केलेल्या याचिकेमध्ये चौधरी यांनी म्हटले आहे की, फेसबुक अकाऊंट बंद केल्यास त्यांचा सर्व डेटा आणि मित्रांसोबतचा संपर्क तुटणार आहे. जो पुन्हा मिळणारा नाही. यावर खंडपीठाने माफ करा, तुम्ही हे बंद करा. तुम्ही कधीही नवीन अकाउंटव उघडून शकता. तुम्ही एका जबाबदार संस्थेचा हिस्सा आहेत. त्यांचा आदेश मानावाच लागेल. असे चालणार नाही, असे सांगितले.

तसेच ही याचिका फेटाळताना दोन सदस्यीय खंडपीठाने चौधरी यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले. एकतर तुम्ही सैन्यदलाच्या आदेशाचे पालन करा किंवा राजीनामा द्या असे दोन पर्याय ठेवले आहेत. न्यायमुर्ती राजीव सहाय एंडलॉ आणि न्यायमुर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर विचार करण्यासाठी एकही कारण नाही. खासकरून जेव्हा प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जर तुम्हाला फेसबुक आवडत असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे, अशा शब्दात सुनावलं.