‘त्यांनी ED लावली तर मी CD लावेन’, एकनाथ खडसेंचा ‘गजर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 40 वर्षांपासून भाजप सोबत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर जयंत पाटील (Jayant Patil)यांनी खडसेंचं स्वागत केलं. खडसेंना लगेच कुठलंही मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही अशी चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे खडसेंनी देखील माझी कुठलीही अपेक्षा नाही असं जाहीर केलं आहे.

तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलं तर तुमच्या मागे ED ची कारवाई लावतील असं पाटील म्हणाले होते. परंतु त्यांनी ED लावली तर मी CD लावेन असं म्हणत खडसेंनी भाजप आणि नाव न घेता माजी मुख्यमंत्री आणि विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.

खडसे म्हणाले, कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. भाजपमध्ये अनेक लोकं कंटाळली आहे. परंतु बोलू शकत नाहीत” असंही त्यांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, एकनाथ खडसे यांच्याशी कुठल्याही पदाची चर्चा झालेली नाही. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षप्रवेश केला आहे.

अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी सांगितलं की, एकनाथ खडसेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं भाजपला (BJP) लवकरच मोठा धक्का बसणार आहे असा इशाराही त्यांनी गिरीश महाजन (Girish Dattatray Mahajan) आणि भाजपला दिला आहे.