साध्वी प्रज्ञांची लोकसभेतील उमेदवारी म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी : एकनाथ गायकवाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काल भोपाळमधील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहे. त्यावरून सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकूर लोकसभा निवडणुकीत उभे करणे ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे, अशी टीका मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केली आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.

हुतात्मा हेमंत करकरेंचा अपमान देश सहन करणार नाही. जनता निश्चित भाजपला धडा शिकवील. मोदींचा प्रचारही भरकटला आहे. देशातील लोकशाही संकटात असून भाजप एका व्यक्तीच्या नावाने प्रचार करत आहे. हा देश व्यक्तिकेंद्रीत देश कधीच नव्हता. संघाने स्वातंत्र्याला विरोध केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मी मुंबईत आलो त्यावेळी हमाल होतो, परंतु त्याचे भांडवल कधी केले नाही. जनता मतदानातून निश्चित भाजपला धडा शिकवेल, असं गायकवाड यांनी म्हटलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवरही त्यांनी यावर आपले मत व्यक्त केले. राज ठाकरेंमुळे परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. शिवसेनेचा मतदार आता काँग्रेसला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शहरी लोकसंख्या वाढत आहे. स्मार्ट सिटी ही चांगली संकल्पना होती. झोपडपट्टी निर्मुलन आणि रिफ्यूजी कॅम्पचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. धारावी पुर्नविकास अजूनही प्रलंबित आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्पोरेट कार्यालय पूर्ण होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहू शकले नाही. मोदी सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच नोटबंदी आणि जीएसटीने धारावीसह देशातील लहान उद्योग नष्ट झाले. जीएसटीची पुर्नरचना केली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.