एकनाथ खडसेंच्या होमपिचवर भाजपची पुन्हा पक्षबांधणी, पण..

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन –ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने एकुणच उत्तर महाराष्ट्रात आगामी काळात भाजपाची स्थिती कठिण होणार असल्याचे दिसत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपाने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नव्याने पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी गुरूवारी मुक्ताईनगरमध्ये बैठक घेण्यात आली. मात्र, भाजपा नेते गिरीश महाजन आणि जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी दिलेल्या जोरदार धक्क्यातून सावरण्यासाठी भाजपाने गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. परंतु, भाजपचे आमदार गिरीश महाजन बैठकीला आलेच नाहीत. विशेष म्हणजे बैठकीकडे बहुतांश कार्यकर्ते फिरकलेच नव्हते. यामुळे भाजपासाठी पुढील वाटचाल अवघड असल्याचे यातून दिसून आले. बैठकीला गिरीश महाजन उपस्थित न राहिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते, मात्र ते महत्वाच्या कामासाठी मुंबईला गेल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

मंगळवारी सुद्धा जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. यानंतर ताबडतोब दुसरी बैठक गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भाजपने एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे घेतली. मात्र, या बैठकीला महाजनच अनुपस्थित राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मंगळवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे अनुपस्थिती होत्या, तर प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे कामानिमित्त दिल्लीला गेल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत असे महाजन यांनी म्हटले होते.

गिरीश महाजन यांनी दिली अशी प्रतिक्रिया
कोअर कमिटीनंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना महटले होते की, एकनाथ खडसेंच्या पक्षांतराने भाजपमध्ये कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही आमदार, खासदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही. भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. व्यक्ती सापेक्ष पक्ष नाही. कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली होती.