एकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर ?, राष्ट्रवादीचं सोशल इंजिनीअरिंग सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांची शिफारस करण्याचा प्रस्ताव गुरुवारी राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत मांडून तो मंजूर केला जाणार आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये प्रत्येकी चार याप्रमाणे १२ जागांचे समान वाटप करण्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त जागेसाठी भाजपला रामराम ठोकलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे, आदिती नलावडे आणि प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांची नावे चर्चेत आहे. या चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. तद्वतच, खडसेंना विधान परिषदेवर पाठवून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांना नामोहरम करण्यासाठी खडसेंना संधी
एकनाथ खडसे हे ओबीसी समाजातून आले असून, त्यांचा ओबीसी समाजावर मोठा प्रभाव आहे. म्हणून भुजबळ खडसे यांच्या साहाय्याने ओबीसी मतांना आपल्याकडे वळवण्याचा पवारांचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे खडसेंचे उत्तर महाराष्ट्रात असलेले राजकीय वजन वापरुन सहकारी बँकांपासून ते पालिका, नगरपरिषदेमध्ये भाजपला हद्दपार करण्यासाठी राष्ट्रवादीचा भर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच विधान परिषदेत भाजपने प्रवीण दरेकरांच्या रूपाने अभ्यासू विरोधी पक्षनेता दिला आहे. खडसेंना विधान परिषदेत आणल्यास विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी फायदा होणार असल्याने, त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘वंचित’ची भीती, शिंदेंना लॉटरी !
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा एका मोठा चाहता वर्ग असून, ते दलित समजातून आले आहे. ते रिपब्लिकन चळवळीत सक्रिय आहेत. म्हणून त्यांना उमदेवार देत वंचितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी वंचित समाजाची मते मोठ्या प्रमाणात फोडली होती. म्हणूनच ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करुन घेण्यावर राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईत बस्तान बसवण्यासाठी आदिती नलावडे यांना संधी
राष्ट्रवादीच्या मुंबई संघटक आदिती नलावडे यांना उमेदवारी जाहीर करुन मुंबईत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून असणार आहे. सचिन आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबईतील संघटन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. म्हणून आदिती नलावडे यांना संधी देत मुंबईत राष्ट्रवादीने बस्तान बसवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे सांगितले जात आहे.