येत्या 2 दिवसात भाजपला 2 मोठे धक्के ! एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. अखेर आता एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाही तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

एकनाथ खडसे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंचं जाणं भाजपला धक्का देणार हे मात्र नक्की आहे. परंतु खडसे यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देत आहेत.

इतकंच नाही तर खडसेंनी त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबर रोजी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहनही केलं आहे अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केलं होतं. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते. राज्याचे अर्थ मंत्री होते. एक नेता म्हणून खडसेंचं मोठं योगदान आहे. राजकीय निर्णय काय घ्यायचा हे त्यांना पहावं लागणार आहे असंही पवार म्हणाले होते. राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे. फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे.