एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पक्ष नेत्यांविषयी नाव न घेता आरोप करणार्‍या खडसे यांनी पहिल्यादाच फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करुन ड्रायक्लीनर असे संबोधले आहे.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे बोट दाखविले आहे.

पक्षाकडे मी वारंवार हे सांगितले आहे. ज्यांनी हे केलंय, त्यांच्याकडून याची उत्तर घ्या. ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. ज्यांनी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले. ज्यांनी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे दिले आहेत. तर सहा महिने झाले निवडणूक होऊन पक्ष त्यावर कार्यवाही का करत नाही. निदान आम्हाला बोलून तरी विचारा. मी पुरावे दिले आहेत. व्हिडीओ कॅसेट दिल्या आहेत. रेकॉर्डिंग दिले आहे. वर्तमानपत्राची कात्रण दिली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याचे मान्य केले होते. मग कारवाई करायला विलंब का होतोय. माझ राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का? जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल खडसे यांनी विचारला आहे. देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली. आमचा ड्रायक्लिनरच होता. कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची. फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.