‘हे जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, ही तर जळगावची बदनामी’ – एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र, वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने आहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. हा प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आक्रमक झाले असून त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण ?
जळगावमधील आशादीप या शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर गृहमंत्रालयाने सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी दरम्यान असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सभागृहात या प्रकरणाची माहिती देताना असा कोणाताही प्रकार वसतिगृहात घडलेला नाही. या संदर्भात आलेल्या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे देशमुख यांनी सभागृहात सांगितले.