एकनाथ खडसेंना ‘या’ नेत्याकडून शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत अनेक गौप्यस्फोट केले. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे मंत्री आणि नेते उदय सामंत यांनी एकनाथ खडसे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपमध्ये एखाद्या ज्येष्ठ नेत्यावर अशी वेळ येणं हे दुर्दैवी असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत म्हणाले, एका ज्येष्ठ नेत्यावर जर भाजपमध्ये अशी वेळ येत असेल तर ती दुर्दैवी आहे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. परंतू भविष्यात जर ते कोणत्या पक्षाचा विचार करत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विचार करण्यास हरकत नाही, असे म्हणत खडसेंनी शिवसेनेत यावे असे ते म्हणाले. खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप आणि त्यांची नाराजी लक्षात घेता उदय सामंत यांनी त्यांना भविष्यात शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय काय उद्योग केले ते मला महिती आहेत. मी पक्षाच्या विरोधात भाषा केली नाही. मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच, असे एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती, ते या बारभाई कारस्थानातूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.