नाथाभाऊ इज बॅक ! एकनाथ खडसेंनी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

जळगाव :  पोलीसनामा ऑनलाइन  –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदाराकीवरून सुरु असलेले राजकारण चांगलेच तापलं होते. मात्र, अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. आयोगाने निवडणूक होणार असल्याचे जाहीर करताच सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आता यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे एक मागणी केली आहे.

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. एकनाथ खडसे आज दुपारी जळगाव मध्ये आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खडसे म्हणाले, मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नाकारण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल, असे खडसे म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे.