रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘नाथाभाऊ मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केलंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (bjp) बंडखोर नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहे. ते शरद पवारांच्या (sharad pawar) नेतृत्वाखालील एस काँग्रेसमध्ये (congress) होते, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला एकनाथ खडसे कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

एका मराठी न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी पवार यांनी नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यामध्ये नाथाभाऊ होते, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. ते पुढे म्हणाले, मी भाजपमध्ये नाथाभाऊंना सीनियर आहेत. त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहित आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

ज्या पक्षावर आरोप केले त्याच पक्षात प्रवेश
राजकारणामध्ये पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली, पदं भोगली आणि 40 वर्षानंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये असे वाटत होते. त्यांच्या मनातील खदखद सर्वांना माहित होते. ते आज ना उद्या निर्णय घेतील असे वाटत होते. त्यामुळे त्याचे मन वळवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली, असा टोला त्यांनी लगावला.

तर मुख्यमंत्रीपदावर दावा करता आला असता
एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊ यांच्यकडेच लाल दिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्विकारण्याचे आदेश दिले होते. मात्र भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी प्रकृतीचे कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीस यांचेकडे गेले. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचे सांगत दानवे म्हणाले, नाथाभाऊंनी त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद स्विकारले असते तर ते मुख्यमंत्रीपदावर दावा करु शकले असते, असे दानवे म्हणाले.

You might also like