एकनाथ खडसेंना राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्यासाठी ‘हा’ मुद्दा अडचणीचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी खडसे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे सुद्धा बोलले जात आहे. एकाच घरात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यत्व दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप पक्षावर होण्याची शक्यता असल्याने पक्षाकडून देखील खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागांवर लवकरच निवडणूक होईल. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेल्या खडसेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा आहे. यासह रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले याचे नावे देखील चर्चेत आहेत.

असे असले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी खडसेंना विधान परिषदेवर संधी देण्याच्या प्रयत्नात आहे. कारण खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे लोकसभेत खासदार आहेत. त्यात खडसे यांची राज्यसभेवर निवड झाल्यावर पक्षावर घराणेशाहीचा आरोप होईल. त्यामुळे खडसेंच्या राज्यसभेच्या वर्णीवर घराणेशाहीचा मुद्दा अडथळा ठरु शकतो.

विधान परिषदेवर खडसे यांना घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यात खडसे देखील विरोधी पक्षनेते पद दिले तरच ते विधान परिषदेवर जाण्यास तयार होतील अशी शक्यता आहे. कारण सध्या विरोधी पक्ष नेते असलेले प्रवीण दरेकर खडसेंच्या तुलनेत ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली काम करण्यास खडसे तयार होणार नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसे यांची नाराजी भाजप कशी दूर करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.