एकनाथ खडसेंना राज्यसभेची ‘ऑफर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ आता पुढील महिन्यात संपत आला आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. याकरिता भाजप कोणत्या नेत्यांना पुढे करणार याबाबत जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे.

या नावांमध्ये आता भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यामुळेच खडसे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यांच्या नावांची जोरदार चर्चा

भाजपनं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे आधीच निश्चित केली आहेत. तिसऱ्या नावासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस होती. संजय काकडे यांनी तर उदयनराजे यांच्या नावाला विरोध दर्शवत दुसऱ्या जागेवर दावा ठोकला होता. मात्र, आता त्यांचं नाव मागे पडल्याचं दिसत आहे. त्यांच्या जागी खडसे यांचं नाव पुढं करण्यात आलं आहे. खडसे यांनी राज्यसभेत जावं, असा राज्यातील नेत्यांचा आग्रह असल्याचं समजतं. खडसे तो आग्रह मान्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्ष सोडण्याचा दिला होता इशारा

२०१९ विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान भाजपने खडसेंना तिकीट नाकारलं होतं त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. पक्षाबद्दलची नाराजी त्यांनी साफ बोलून दाखवली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना पेव फुटले होते. मात्र नंतर त्यांनी आधीपासून पक्षाशी प्रामाणिक असून पक्ष सोडणार नाही असे स्पष्ट केले. आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षांना त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे असे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीकडून पवार आणि फौजिया खान

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व माजिद मेमन हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. तर, मेमन यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस व शिवसेनेनं अद्याप आपली नावे जाहीर केलेली नाहीत.