‘एकनाथ खडसें’नी विधान परिषदेच्या उमेदवारीवरून केला खळबळजनक ‘खुलासा’, म्हणाले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले होते त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडेंसारख्या दिग्गजांना डावलले होते आणि नवीन उमेदवारांना संधी दिली होती. दरम्यान आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसेंनी विधान परिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आज पत्रकारांशी बोलताना खडसेंनी खुलासा केला की, ‘विधान परिषद निवडणुकीसाठी माझ्यासह, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. परंतु आम्हाला डावलून भाजपने 4 नवीन उमेदवारांना संधी दिली. ज्या लोकांनी फॉर्म भरला ते सकाळी हजर होते, इतक्या कमी वेळात ते हजर कसे झाले ? विशेष म्हणजे त्यांची कागदपत्र मार्च महिन्यामध्येच जमवण्यात आली होती. कारण त्यांना यापूर्वीच सांगण्यात आले होते की तुमचे तिकीट भाजपकडून फायनल आहे. जर हे आधीपासूनच ठरलं होतं तर आमची शिफारस करण्याची गरजच नव्हती. भाजपच्या संसदीय बोर्डाकडे फक्त आमच्या नावाची शिफारस केली होती, या चार उमेदवारांची नाव पाठवली नव्हती’, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

तसेच एकनाथ खडसे हे कोथरूडबाबत देखील बोलले, ते म्हणाले की कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना विधान परिषदेचं तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु त्यांनाही डावलण्यात आलं. तसंच, त्यांनी स्पष्ट केले की ‘मला उमेदवारी देण्यात आली नाही. याबाबत कुठल्याही नेत्यावर माझा थेट आरोप नसून जे काही सांगायचं असेल ते पक्षाच्या वरिष्ठांकडे सांगणार आहे’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खडसे म्हणाले, काँग्रेसकडून ऑफर होती

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी सांगितले की ‘मला विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती. जर मी काँग्रेसची उमेदवारी घेतली असती तर भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी मला क्रॉस वोट केलं असतं, आणि या आमदारांनी तसं माझ्याकडे मान्यही केलं होतं,’ असा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केला होता.