राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी म्हणाले – ‘पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. खडसे यांनी बुधवारी आपल्या भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक शब्द दिला.

एकनाथ खडसे म्हणाले, “शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपचे काम केले, त्याच निष्ठेने मी आता राष्ट्रवादीचे काम करेन. मी भाजपा पक्ष वाढवला, तसेच यापुढे राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करुन दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ पाहिजे आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभे राहिले, तर मी कुणालाही घाबरत नाही.”

“मागील चाळीस वर्षांपासून मी राजकारण करत आहे. पण कधी सुद्धा कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. तोंडावर गोड बोलायचे, तुम्ही जेष्ठ म्हणायचे आणि मागून वार करायचे हे कधीही केले नाही. चाळीस वर्षे मी भाजपची सेवा केली, त्याबदल्यात त्यांनी मला काय दिले ? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपचे लोक देऊ शकले नाहीत. मी पक्ष सोडावा म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा होती. कारण पाठीमागून कारवाया करत राहाणे हे माझ्या तत्वात कधीच बसले नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.