एकनाथ खडसेंनी दिला फक्त 2 ओळींचा राजीनामा, आता राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यांनंतर एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषदेत सल बोलून दाखवली. पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्त्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. मात्र एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसे यांना काय मिळणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. यामध्ये सर्वप्रथम एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस करुन विधान परिषदेत पाठवलं जाईल. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, असं देखील सांगितलं जात आहेत. एकनाथ खडसेंना कृषीमंत्रीपद दिलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे. यात कृषी खात सध्या शिवसेनेकडे असून दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आहे.

एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवायचं असेल तर महाविकास आघाडीत खातेबदल करावे लागेल. यात मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने कृषी खाते घेतल्यास त्याबदल्यात शिवसेनेला गृहनिर्माण खाते सोडावं लागेल. सध्या गृहनिर्माण खात्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित आहे.

खडसेंचा 2 ओळींचा राजीनामा

अलीकडच्या काळात डावललं जात असल्याने खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. गेली चाळीस वर्षे भाजपाच्या वाटचालीत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं योगदान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर एकनाथ खडसेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना एकनाथ खडसेंनी अवघ्या 2 ओळी लिहील्या आहेत. त्यात म्हटलंय की, मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आलं आहे.