संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्या, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सल्ला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकामागोमाग एक आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्या असे आवाहन केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खडसे हे आता फडणवीसांचं नाव घेऊन टीका करु लागले आहेत. फडणवीस हे ड्राय क्लीनर असल्याचे त्यांनी म्हटले होते. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवू लागले आहेत. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन या घोषणेमुळंच राज्यात भाजपची सत्ता आली नही की काय, याची मी शोध घेत असल्याचा टोलाही खडसे यांनी फडणवीसांना हाणला होता. कोरोनाचे वातावरण संपल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

संघर्षाऐवजी संवादाची भूमिका घ्यावी

खडसेच्या आरोपाबाबत आणि अस्वस्थेबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्याशी पक्षातील काही मंडळींनी संवाद साधला आहे. त्यामुळे लवकरच सर्व काही नीट होईल. खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. दाऊदच्या पत्नीचे आणि नाथाभाऊंचे संभाषण झाल्याचा आरोप होता. त्यामध्ये 24 तासात त्यांना क्लीन चिट मिळाली. ज्या एमआयडीसी भूखंड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली. ज्या भूखंड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याना दोषी नसल्याचा निर्वाळा दिला. सर्व प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवल्यानंतर उठसूठ फडणवीसांवर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी आता संघर्षाऐवजी संवादाची भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणावरुन सरकारवर आरोप

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर आरोप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यावेळी गरज होती, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विचारात घेतले नाही, आता न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर धावपळ सुरु आहे. तरीही मराठा आरक्षण प्रश्नी भाजप सरकार सोबत आहे. सरकारला या प्रकरणात जे सहकार्य लागेल ते करायला आम्ही तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कांदा निर्यातीबाबत घेतलेला निर्णय चुकीचा

केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ते म्हणाले उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मिळून अनुदान द्यावे. त्याबाबत आज शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.