…अन् ‘त्या’ क्षणापासून भाजपमध्ये माझा छळ सुरू झाला, नाथाभाऊंच्या डोळयात अश्रू आले दाटून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर आता खडसेंनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणाही साधला आहे. मुक्ताईनगरमध्ये ते पत्रकारांसोबत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “माझी पक्षावर, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर कोणतीही नाराजी नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला प्रचंड त्रास दिला. त्यांच्यामुळं माझी बदनामी झाली. मला आणि माझ्या कुटुंबाला मनस्ताप झाला.” असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर तोफ डागली.

खडसे म्हणाले, “गेली 40 वर्षे मी भाजपला वाढवण्याचं काम केलं. पक्ष घराघरात नेण्यासाठी कष्ट घेतले. पक्षानं मला अनेक पदं दिली हे मी कधीही नाकारणार नाही. पण मी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. माझी पक्षावर नाराजी नाही. केवळ एका व्यक्तीवर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री असावा असं मत मी व्यक्त केलं होतं. त्यानंतर माझ्यासोबत जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं.” असंही खडसे म्हणाले. यावेळी त्यांना गहिवरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

पुढं खडसे म्हणाले, “माझ्यामागे भ्रष्टाचाराविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. मी 15 दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र यामुळं मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.”