‘गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं’

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मागील पाच वर्षात मुंडे यांचे स्मारक उभारु शकले नाहीत अशी टीका खडसे यांनी केली. मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्याचे काम मी केले होते. आज आमचा वाघ नाही मात्र पंकजा मुंडे या वाघीण आहेत. आम्ही हजारोंच्या संख्येने त्यांच्यासोबत असल्याचे खडसेंनी सांगितले.

पंकजाचा ठरवून पराभव –
भाजपचे आजचे चित्र राज्यात उभं राहिलं ते जनतेला मान्य नाही. एवढंच नाही पंकजा मुंडे यांचा निवडणुकीतला पराभव ठरवून केला गेला आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर केला. तसेच आपल्याच लोकांनी माझेही नुकसान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे पक्ष उभारला. त्यांनी तुम्हाला मंत्री केले, मुख्यमंत्री झालात. त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं, असा सवाल खडसेंनी विचारला.

तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते –
पक्ष सोडून गेलं पाहिजे ही नीती पक्षातल्या लोकांकडून राबवली जात आहे ती योग्य नाही. छळायचं, मारायचं, दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की गोपीनाथ मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते. याला काहीही अर्थ नाही. एकनाथ खडसे यांच्या भाषणाच्या रुपाने भाजपातली खदखद चव्हाट्यावर आली आहे.

मुंडेंसारखा संघर्ष माझ्या वाट्याला –
गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तोच संघर्ष आणि तसाच्या तसा संघर्ष आज माझ्या वाट्याला आला आहे. मी तसाच संघर्ष आज अनुभवतो आहे असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ असं ते कायम म्हणायचे. आजही तो आवाज येईल असं वाटतं. मात्र तसं होत नाही. आजही मला भाजप पक्ष प्रिय आहे, मात्र भाजपचे आजचे चित्र राज्याला मान्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/