जळगाव जिल्हा परिषदेत एकनाथ खडसे समर्थकांचा ‘विजय’, महाविकास आघाडीला सपशेल ‘अपयश’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपने बाजी मारली आहे गेल्या तीस वर्षांपासून हा भाजपचा गड राहिलेला आहे. भाजप नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी यावेळी सामोपचाराची भूमिका घेत पक्षासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे भाजपला हा विजय मिळवता आल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ खडसे समर्थक असलेल्या रंजना पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून यावेळी निवडून आलेल्या आहेत. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला यामध्ये हार पत्करावी लागली आहे. विशेष म्हणजे भाजपने महाविकास आघाडीचे एक मत फोडल्याचे देखील यावेळी सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले होते. मात्र या वेळी महाविकास आघाडीचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसून आले यामुळेच जळगाव जिल्हा परिषदेत भाजपला यश मिळवता आले आहे.

भाजपच्या दृष्टीने हा विजय खूप महत्वाचा मानला जात आहे कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी भाजपला धक्के बसत होते त्यात अशा एका विजयाची भाजपला गरज होती. त्याचप्रमाणे खडसे आणि महाजन यांच्यातील कलह या निमित्ताने मिटल्याचे देखील दिसून आले त्यामुळेच कुठेतरी भाजपची ताकद वाढणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/