एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत काय किंमत ? थोड्याच दिवसांत तुम्हाला समजेल !

नगर : पोलीसनामा ऑनलाइन –   एकनाथ खडसे (eknath khadse) यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मनापासून स्वागत करतो. आता खडसे यांच्यामुळे खान्देशात राष्ट्रवादीला चांगले बळ मिळेल. राज्यामध्ये खडसे यांना जेथे जेथे जनाधार आहे, तेथे राष्ट्रवादी बळकट होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है, असे वक्तव्य करतानाच त्यांनी आणखी काही जण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे यावेळी संकेत दिले.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरामध्येही पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर वक्तव्य केलं. ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचा भाजपचा विस्तार करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. ते त्या पक्षाचे मूळ होते. खडसे हे उद्या राष्ट्रवादीत येतात, त्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना फार आनंद झाला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आता खान्देशामध्ये राष्ट्रवादीला एक चांगले बळ मिळेल. तसेच राज्यात ज्या ज्या ठिकाणी खडसेंचा जनाधार आहे, तेथेही राष्ट्रवादीला चांगले बळ मिळेल असा मला विश्वा आहे, असे ही मुश्रीफ म्हणाले.

भाजपचे आणखी काही जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का ? असे मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है, असे वक्तव्य करत त्यांनी आणखी काही जण संपर्कात असल्याचे संकेत दिले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये जी किंमत होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. खडसेंना याचा पश्चात्ताप होईल, असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केले होते. शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत किंमत मिळणार का ?हे त्यांना थोड्याच दिवसांत चांगले समजेल. पण यावेळी मात्र मुश्रीफ यांनी एकनाथ खडसे यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार ? याबाबत अधिक बोलणे टाळले.

You might also like