एकनाथ खडसे हेलिकॉप्टरनं तर कार्यकर्ते वाहनानं मुंबई गाठणार, शक्तिप्रदर्शन करणार

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शुक्रवारी (दि. 23) दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP chief Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर राष्ट्रवादीनेही कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे.

जळगावमधून एकनाथ खडसे हे मु्क्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे ( (rohini Khadse) असणार आहेत. तुर्तास खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे या भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर खडसे यांच्यासोबत भाजपाचे काही माजी आमदारही यावेळी प्रवेश करणार असल्याचे सांगितल जात आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील
शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अनेक वर्षाचा अनुभव आणि राज्यातील विविध विषयांचा जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) म्हणाले. तसेच आगामी काळात अनेक राजकीय भूकंप पाहयला मिळतील. खडसे यांच्यासोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छूक असल्याचे ते म्हणाले.

खडसे यांचा राजकीय प्रवास कसा होता
1980 मध्ये खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रीय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया भक्कम करण्यात त्यांचा वाटा मोठा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसे यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांनी कोथडी ग्रामपंचायतची पहिली निवडणूक लढवली होती. मात्र पहिल्याच निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 1987 मध्ये त्याच कोथडीचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये ते मुक्ताईनगरमधून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा वेळा ( 1989 ते 2019) म्हणजे तब्बल 30 वर्षे मुक्ताईनगरचा बालेकिल्ला खडसे यांच्याकडे होता.

1995 ते 99 या युतीच्या काळात त्यांनी अर्थ आणि सिंचन या दोन खात्याचे मंत्री म्हणून जाबादारी स्विकारली. त्यांनी 2009 ते 2014 या काळात विरोधीपक्षनेता म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. पण फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल खात्याची धूरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.2019 विधानसभा निवडणूकीत भापनाने त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले गेले. मात्र यात त्यांचा पराभव झाला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकवेळा विधानसभेत सरकारला धारेवर धरले आहे. आकडेवारी आणि पुराव्यासह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत असत. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना खडसे यांनी सलग आठ तास भाषण करून विक्रम नोंदविला. या भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखऱ यांनी खडसे यांचा विशेष सन्मान केला होता.