एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर आणखी एक गंभीर आरोप, भाजपामध्ये अनेकजण आहेत ‘नाराज’

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला (bjp) रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनकक खुलासा एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे. एवढेच नाही तर इतक्या वर्षानंतर आपण भाजप का सोडतोय याचा मोठा खुलासा देखील खडसे यांनी केला आहे.

भाजप पक्ष सोडण्याचा मी आताच निर्णय का घेतला असे विचारले जात आहे. पण पक्ष सोडण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला होता. मागील निवडणुकीच्यावेळी मला भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळीच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतो. माझ्याकडे एबी फॉर्म सुद्धा तयार होता. अजित पवार (Ajit pawar) आणि दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी वेळोवेळी निरोप दिला होता. पण त्यावेळी निर्णय घेता आला नाही, असे खडसे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे जे बोलतील तोच निर्णय अखेरचा मानला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपमध्ये मी एकटाच नाही, अनेक नेते नाराज आहेत. चंद्रकांत पाटील यांना देखील आपला निर्णय रेटून लावता येत नाही. पक्षात सामूहिक नेतृत्त्व राहिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मी अमित शहा यांना दिल्लीत भेटलो होतो, त्यांच्या कानावर हे सर्व घातले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही माहिती पुरवली होती. गेल्या चार वर्षामध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन तक्रार केली होती. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली होती. नितीन गडकरी यांची अनेक वेळा भेट घेतली होती. पण काहीही झाले नाही, असे खडसे म्हणाले. तसेच मी राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरु असताना कोणत्याही भाजपच्या नेत्याने माझ्याशी संवाद साधला नाही. कुणीही मला फोन केला नाही. फक्त चंद्रकांत पाटील यांनी फोन केल्याचे खडसेंनी सांगितले.