एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भाजपच्या स्थापनेपासून गेली चार दशके पक्षात कार्यरत राहिलेले उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मानसिक छळामुळे पक्ष सोडत असल्याचे खडसे यांनी जाहीर केले. ते २३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत मत व्यक्त केलं आहे.

वार्ताहरांना बोलताना एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत संजय राऊत म्हणाले, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत महाविकास आघाडीत खडसेंच स्वागत केलं आहे. पण आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. मागील ४० वर्षे काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठे कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी…असे राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, भाजप मध्ये अन्याय होत असल्याची भावना अनेकवेळा जाहीरपणे मांडणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. त्यानुसार अखेर त्यांनी बुधवार भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसेंनी कोणतीही अटक ठेवली नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे, पाटील यांनी सांगितलं.

दिल्या घरी सुखी राहावं

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या पक्षात आपले राजकीय भवितव्य घडले. बाजार समिती ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कोणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, मात्र त्याकरता काही काळ जाणे महत्वाचे होते. नाथाभाऊ आमचे चांगले मित्र आहेत. पण आता जिथे गेलेत तिथे त्यांनी सुखी राहावे, असे दानवे यांनी म्हटलं.