एकनाथ खडसे अन् शरद पवारांची ‘गुप्तभेट’, PM मोदींच्या फोटोचा ‘फलक’ही काढला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक गुप्त भेट नागुरात झाल्याची माहिती आहे. अनेक दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असून त्यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर टीकाही केली आहे. ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. परंतु, त्यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र, या गुप्तभेटीने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या नागपुरात आहेत. त्यातच एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार खडसे आणि पवार यांची भेट झाल्याची माहिती आहे. दरम्यान, खडसेंच्या मुक्ताईनगरमधील भाजपा कार्यालयावरील मोदींचा फोटो असलेला भाजपाचा फलकही काढण्यात आला आहे. त्यामुळे, खडसे राष्ट्रवादीत प्रवेशाचे वृत्त नाकारात असले तरी सध्या घडत असलेल्या सर्व घडामोडी बघता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच खडसेंनी गोपीनाथ गडावरून पक्षनेतृत्वावर केलेला हल्लाबोल राज्यात चर्चेचा विषय झाला होता. मी काहीही करू शकतो, असे थेट पक्षाला सुनावणारे खडसे हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागपुरात आले असतानाही त्यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतली नाही, अशी सुद्धा चर्चा होती. मात्र, स्वत: खडसे यांनी विधानभवनात कामानिमित्त आलो आहे, असे म्हणत पक्ष बदलाच्या बातम्यांना खोटे ठरवले होते. परंतु, आता खडसेंनी गुप्तपणे पवारांची भेट घेतल्याची माहिती असून मुक्ताईनगरमधील त्यांच्या भाजपा कार्यालयावरील मोदींचा फोटो असलेला फलकही हटवला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/