गेली 5 वर्षे मावळचे खासदार असूनही पवना जलवाहिनीचा प्रश्‍न का सोडविला नाही ?, मनपा पक्षनेते पवारांचा प्रश्‍न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आठवड्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सक्त सूचना करीत ताकीद दिली आहे. आता, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना कशी जाग आली आहे ? मावळचे खासदार असताना त्यांना गेले 5 वर्षे पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी का लावता आला नाही. त्यासंदर्भात कोणतीही कारवाई करता का आली नाही, असा प्रश्‍न पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी परिषदेत उपस्थित केला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीप्रश्‍नांवरून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पालिका प्रशानवावर गुरूवारी (दि.15) पत्रकार परिषदेत टीका केली. त्यास उत्तरे देताना ते बोलत होते.

एकनाथ पवार म्हणाले की, पाणी प्रश्‍नांवर सत्ताधारी भाजप गंभीर असून, तो सोडविण्यासाठी यशस्वी पावले टाकत आहे. पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी आठवड्यापूर्वी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा सक्त सूचना आयुक्त हर्डीकर यांना दिल्या आहेत. खासदार बारणे यांना शहरातील पाण्यावरून अचानक कशी काय जाग आली. त्यांनी आपली भूमिका का बदलली, असा खोचक सवाल यांनी उपस्थित केला.

पाणीपुरवठ्यासंदर्भातील गेल्या 2 वर्षांतील सर्व कामांच्या चौकशीची मागणी खासदार बारणे हे करणार आहेत. कोणत्याही चौकशीला भाजप घाबरत नसून, त्यांनी दोनऐवजी गेल्या 15 वर्षांतील कामांची चौकशी लावावी, असे पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

पाणी प्रश्‍नांवर सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा झाली आहे. त्यात सुचविल्या गेलेल्या उपाययोजनावर प्रशासन काम करीत आहे. आंद्रा-भामा आसखेड धरण पाणी योजनेचे फेरआरक्षण भाजपने पुन्हा मंजुर करून घेतले. तसेच, पुणे महापालिकेच्या वाघोली प्रकल्पातील 30 एमएलडी पाणी शहराला मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पवना जलवाहिनीचा इतके दिवस भिंजत पडलेले प्रश्‍न खासदार असूनही त्यांना सोडविता आला नाही. त्यात त्यांना रस वाटला नाही, असा टोला त्यांनी लगावला. तो प्रश्‍नही भाजप मार्गी लावणार आहे, असा दावा त्यांनी केला.

डोळ्यासमोर ‘व्हिजन’ ठेवून भाजप काम करीत असून, येत्या महापालिका निवडणुकीपर्यंत पाणी प्रश्‍न पूर्णपणे सोडविला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com