महाड इमारत दुर्घटना : एकनाथ शिंदेंनी घेतलं 2 मुलांचं पालकत्व ! मुलांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले जाणार ‘एवढे’ लाख !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाड येथील इमारत दुर्घटनेत आई वडिल गमावलेल्या दोन चिमुरड्यांसाठी धावून आले आहेत. शिंदे यांनी दोन्ही मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. या दोन्ही मुलांच्या खात्यावर प्रत्येकी 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवलं जाणार आहे. मोहम्मद बांगी आणि अमहद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावं आहेत. मदत पथकांनी 18 तास प्रयत्न केल्यानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेत त्याच्या आई आणि भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा शेख अहमद वेळीच बाहेर पडला त्यामुळं तो बचावला. परंतु त्यानं त्याचं कुटुंब मात्र गमावलं.

सदर दोन्ही लहानग्यांचं पालकत्व स्विकारल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. या दोन्ही मुलांच्या खात्यावर प्रत्येकी 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवलं जाणार आहे. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या वतीनं उचलण्यात येणार आहे. या दुर्घटनेची बातमी समजताच शिंदे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्याला वेग दिला होता. “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. आजही शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळं सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचं पालकत्व स्विकारत आहे.” असंही ते म्हणाले.

रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. सोमवारी(दि 24 ऑगस्ट) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. अखेर 40 तासांनी इमारतीचं मदत व बचावकार्य पूर्ण झालं होतं.या दुर्घटनेत तब्बल 16 जाणांचा मृत्यू झाला आहे. यात 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यातून 9 जणांना सुखरूप बाहेर काढ्यात आलं आहे. यात 5 पुरुष, 3 महिला आणि 1 बालकाचा समावेश आहे असं समजत आहे.