‘एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील’, आव्हाडांचं खास Tweet !

ठाणे : पोलीसनामा ऑानलाईन –   राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना झाल्यांच समजताच मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा घेण्याचा सल्ला दिला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करत शिंदे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, “मंत्रिमंडळातील माझे लढवय्ये सहकारी एकनाथ शिंदे हे कोरोनाग्रस्त झाल्याचं कळलं. एकाजागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळं ते पुढील काही दिवसातच आपल्यात कोरोनाविरुद्धची लढाई लढताना दिसतील.” असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. लवकर बरे व्हा असं म्हणत आव्हाडांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना झाला होता. जवळपास महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. आता पुन्हा एकदा ते सक्रिय झाले आहेत. गेल्या 5-6 दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. बुधवारी त्यांचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यांनी गुरुवारी (दि 24 सप्टेंबर) ट्विट करत लिहिलं की, “काल(बुधवार दि 23 सप्टेंबर) मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटीव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रकृती ठिक आहे.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वत:ची कोविड चाचणी करून आवश्यकत ती खबरदारी घ्यावी ही विनंती.”