‘नाराजी’ प्रकरणावर महाविकासमधील ‘दिग्गज’ मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या नाराजी नाट्याची चर्चा संपता संपेना झाली आहे. त्यातच ठाकरे सरकारमधील सर्वात पॉवरफुल मंत्री एकनाथ शिंदे हेच नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या खात्याचे विभाजन करून नवं मंत्रालय तयार करण्यात आल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोललं जातंय. सुरुवातीला शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा होती. या सगळ्या वादावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणावरही नाराज नाही. काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे.

सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहे. माझ्या मंत्रालयातील सर्व कामं व्यवस्थित सुरु आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही. दरम्यान या प्रकरणावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाचे विभाजन होऊन नगरविकास – 3 विभाग निर्माण होत असल्याच्या चर्चेवरून भाजप नेत्यांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, हा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याचा प्रयत्न आहे. दरेकर पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मागे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. आता ते नगरविकास मंत्री झाले. मात्र, त्यातलीही खाती काढून घेण्यात येणार आहेत. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत पंख छाटण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

काय आहे नाराजी ?
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचे विभाजन होऊन नगरविकास – 3 असे नवं खातं निर्माण केले जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल असे सांगितले जातेय. ही सर्व खाती नगरविकास विभागाकडे असून जर हीच खाती गेली तर नगरविकास खात्याला काहीच अर्थ राहणार नसल्याची चर्चा आहे.

नगरविकास खात्याचे विभाजन करून यातील महत्त्वाची खाती स्वत: मुख्यमंत्री घेतील किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवली जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे हे ठाकरे परिवारानंतर सगळ्यात ताकदवान नेते समजले जातात. सत्तास्थापनेच्यावेळी एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्यात मोठे योगदान आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like