सुरेश प्रभुंना उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेचा प्रचार करणार नाही

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशा प्रत्येक मतदारसंघाच्या वेगवेगळ्या वादावादीचे चित्र सध्या समोर येते आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी हट्ट धरला आहे. सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

भाजपच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठक या मतदारसंघाचे प्रभारी असणारे प्रसाद लाड यांनी घेतली. त्या बैठकीत भाजपच्या कार्यर्त्यांनी सुरेश प्रभू यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. युतीचे काम करण्याच्या बाबत पडलेला पेच सोडवण्यासाठी प्रसाद लाड हे कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आपण प्रचारातच उतरणार नाही असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

युती झाल्याने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणुका लढवल्या. आता त्यांच्या बद्दलची कटुता विसरून आम्हाला पक्ष त्यांच्या सोबत निवडणूक प्रचार करायला सांगत आहेत असे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. जसे मुंबईत किरीट सोमय्या यांच्या बद्दल शिवसैनिकात कटुता आहे तशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हि शिवसेने बद्दल कटुता आहे.