तिकीट कापलेल्या रवींद्र गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्याने नाराज असणारे रवींद्र गायकवाड रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. रवींद्र गायकवाड यांच्या नाराजीचा निवडणूक निकालावर परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र गायकवाड मातोश्रीवर भेटीला गेले असता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत मध्यरात्री पर्यंत चर्चा झाली आहे.

रवींद्र गायकवाड यांची काल दुपारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थळी रवींद्र गायकवाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर चौगुले, एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तर रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे.

उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड नाराज झाले आहेत. तर ओमराजे त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होताच राष्ट्रवादीने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमुळे पाटील निंबाळकर घरात राजकीय वैर आहे. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांच्यासाठी शिवसेनेला ओमराजेंची उमेदवारी मागे घेता येणार नाही. अशा राजकीय पेचात रवींद्र गायकवाड यांची नाराजी कशी दूर केली जणार हे आता पाहण्यासारखे राहणार आहे.