निवडणुकीची आचारसंहिता धाब्यावर ; रेल्वेच्या हद्दीत लावले बॅनर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याबरोबरच देशभरात आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. मात्र मुंबई आणि ठाण्यातील राजकीय पक्षांना हा नियम लागू होत नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आचारसंहिता लागू होऊन ४८ तास उलटल्यानंतर शहराच्या अनेक भागांत राजकीय बॅनर्स अजूनही झळकताना दिसत आहेत.

ठाण्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेवटच्या क्षणी मतदारसंघात अनेक भूमिपूजन आणि उदघाटनाचे कार्यक्रम उरकून घेतले . यावेळी ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून या विकासकामांचे गोडवे गाणारे बॅनर्स लावण्यात आले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने शहरातील हे बॅनर्स काढून टाकले. मात्र, रेल्वेच्या हद्दीत अवैधपणे लावण्यात आलेले बॅनर्स अजूनही तसेच आहेत.

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ रेल्वे स्थानकातही हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहितेत रेल्वेच्या हद्दीत बॅनर्स लावलेले चालतात का? असा प्रश्न सामान्यांतून विचारला जात आहे.